नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यापासून आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तरीही मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क वारंवार लढवले जातात. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सूचक विधान केलं आहे.
चेन्नई येथे राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी बोलताना भागवत यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदाची धुरा कुणाकडे सोपवली जाईल, याबाबत विचारलं असता यावर भाजपा आणि नरेंद्र मोदी आपापसात चर्चा करून निर्णय घेतील, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
यावेळी तामिळनाडूमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्यादित विस्ताराबाबतही मोहन भागवत यांनी सूचक विधान केले. ते म्हणाले की, तामिळनाडूमध्ये १०० टक्के राष्ट्रवादी भावना उपस्थित आहे. मात्र काही कृत्रिम अडथळे हे या भावनेला पूर्णपणे अभिव्यक्त होण्यापासून अडवत आहेत. हे कृत्रिम अडथळे फार काळ टिकणार नाहीत, ते संपुष्टात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, तसेच तामिळनाडूमधील जनता संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रहिताप्रति समर्पित राहिलेली आहे. तसेच या मूल्यांना मजबूत करण्याची आवश्यकता आहे, असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.